खडसे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता ! राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी त्यांच्या नावाला विरोध ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी (-governor-appointed) खडसेंचे नाव राष्ट्रवादीकडून पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ( Anjali Damania ) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन खडसेंच्या नावाला विरोध केला आहे.

दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, प्रसारमाध्यमात राज्यपाल नियुक्तीसाठी 12 नावे गेलेली आहेत. त्यातील एक नाव एकनाथ खडसे आहे अशा बातम्या येत आहेत. मात्र खडसेंचे नाव येणे हे संतापजनक आहे. भ्रष्टाचारी नेत्याला पुन्हा राजकारणात राष्ट्रवादी आणू पाहत आहे. त्याच्याविरोधात निवेदन देण्यासाठी मी राज्यपालांची भेट घेतली.

भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला खडसेसारखे नेते पुन्हा राजकारणात आले आणि सक्रीय झाले तर काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे माझे निवेदन आणि कागदपत्रे राज्यपालांना दिली आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच खडसे जे भाषा वापरतायेत त्याबद्दल मी राज्यपालांना निवेदन दिले आहे. राष्ट्रवादी प्रवेशावेळी जे शब्द वापरले बाई दिली नाही तर मागे लावली असे विधान शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख आणि सुप्रिया सुळे असताना केले गेले. त्यांच्या या विधानानंतर मी शरद पवार, सुप्रिया सुळेंना मेसेज केला, शरद पवारांचा मला फोन आला खडसेंनी तुमचं नाव घेतले नाही असे डिफेन्ड केले. पण माझे सोडा, पण कोणत्याही बाईबद्दल असे विधान करणे हे योग्य वाटते का? असा सवाल मी शरद पवारांना केल्याचं अंजली दमानिया म्हणाल्या.

काय म्हणाले होते खडसे?
एका महिलेने विनयभंगाची खोटी तक्रार माझ्याविरुद्ध केली होती. अंजली दमानिया यांनी माझ्यावर हा आरोप लावला, त्यानंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात जाऊन रात्रभर गोंधळ घातला. याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तेथील पोलीस निरीक्षकांनीच मला याबाबत माहिती दिली, ते म्हणाले स्वत: मुख्यमंत्र्यांनीच गुन्हा दाखल करायला सांगितले आहे. त्यानंतर मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो, त्यांच्याकडे जाऊन यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी, त्या महिला रात्रभर गोंधळ घालत होत्या. त्यामुळे गुन्हा दाखल करायला लावले. पुन्हा मागे घेऊयात, असे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले. याप्रकरणामुळे माझी मोठी बदनामी झाली, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्याविरुद्ध राजकारण केले गेले, म्हणून मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे खडसे यांनी सांगितले होते.