‘ठाकरे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना, काँग्रेस , राष्ट्रवादी एकत्र येत राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (anna-hazare-criticize-thackeray-government) यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi) म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा, अशी परिस्थिती आहे, असा टोला अण्णांनी लगावला आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारला या महिन्याच्या अखेरीस एक वर्ष पूर्ण होत आहे.

एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात संवाद साधताना अण्णांनी ही टीका केली. लोकायुक्तांच्या नियुक्ती कायद्यासाठी मी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना पत्र लिहिली. पण मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता कुणीही या पत्राला उत्तर दिले नाही, असे अण्णांनी सांगितले. यावेळी अण्णांनी महाविकास आघाडीच्या कारभारावरही टीका केली. ते म्हणाले की, ठाकरे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा असा कारभार चालला आहे. लोकपालनंतर लोकायुक्त कायदा करायचा आहे. पण मुख्यमंत्री वगळता इतर मंत्र्यांकडून त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

दरम्यान, लोकायुक्त कायदा न झाल्यास पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुंकणार असल्याचा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला आहे. त्यामुळे आता अण्णा पुन्हा एकदा लोकायुक्तांचा मुद्दा चर्चेत आणणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.