Coronavirus : बुलढाण्यात आणखी एक पॉझिटिव्ह, कोरोनाबाधितांची संख्या पोहचली 4 वर

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – बुलढाण्यात कोरोना विषाणूचा संसर्ग आणखी एकाला झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या आता ४ झाली आहे. बुलढाण्यातील एकाचा २८ मार्च रोजी मृत्यु झाला होता. या दरम्यान मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेले तसेच कुटुंबीय अशा ६६ जणांना हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यापैकी निकटच्या संपर्कात असलेल्या ३२ जणांचे स्वाब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी मृत व्यक्तीच्या घरातील दोघांचे अहवाल ३१ मार्च रोजी पॉझिटिव्ह आले होते.

तर २१ जणांचे नमुने निगेटिव्ह आले होते. बुधवारी सकाळी २३ वर्षाच्या एका तरुणाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. अद्याप ८ जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. ते बुधवारी सायंकाळपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकाच ठिकाणच्या ४ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने या परिसराला हाय रिस्क झोन जाहीर करण्यात आला आहे. या भागातील २९ हजार जणांची तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी सांगितले.