एप्रिल फुल केल्यास खावी लागणार जेलची हवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराबाबत सोशल मीडियावर अनेकगोष्टी व्हायरल होत असून, त्यात बऱ्याचबाबी खोट्या किंवा अफवा असतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आता खोटी माहिती प्रसिद्ध करणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत. तसेच, व्हॉट्स अ‍ॅपग्रुपवर अशी माहिती टाकल्यास त्या ग्रुपच्या अ‍ॅडमीनवर देखील कारवाई होणार आहे, सोशल मीडिया तसेच व्हाट्सअपवर सायबर पोलीस लक्ष ठेवत आहेत. दरम्यान 1 एप्रिलला दरवर्षी एकमेकांना वेगवेगळ्या माध्यमातून एप्रिलफुल केले जाते. यंदा नागरिकांनी एप्रिलफुल करताना खोटी माहीती प्रसिद्ध होऊ नये असे आवाहन केले आहे.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन कडक पाऊले उचलत असून, वेगवेगळे प्रयत्न करत आहे. देशात लॉकडाऊन केले आहे. नागरिकांना घरा बाहेर पडू नये असे देखील सांगण्यात आले आहे. मात्र तरीही नागरिक बाहेर पडत आहेत. त्यामुळे विनाकराण बाहेर पडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाबत शासकीय स्तरावरून दररोज माहिती दिली जात आहे. तरीही सोशल मिडीयाच्या माध्यमातून करोना बाधित रुग्णांची संख्या, त्यांच्यावर करण्यात येणारे उपचार, त्या बळी पडलेल्यांची संख्या, विषाणूचा प्रादुर्भाव झालेला परिसर, संशयित करोना बाधित व्यक्ती याची कोणतीही खातरजमा न करता माहिती प्रसारित करण्याची चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर वेगवेगळे उपाय देखील सांगितले जातात. त्यामूळे नाहक नागरिक भयभीत होत आहेत.

माहिती खातरजमा न करता प्रसिद्ध करणे एकप्रकारे गुन्हा आहे. त्यामुळे आता अशी खोटी माहिती प्रसिद्ध करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये त्या व्यक्तीला आर्थिक दंड व शिक्षेची तरतूद आहे.

त्यामुळे सर्व माध्यमे, सोशल मिडीया, व्हॉट्स अ‍ॅप ग्रपुचे अडमीन यांनी खोटी माहिती प्रसिद्ध होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच, करोनाबाबत काय काळजी घ्यावी याची माहिती प्रसिद्ध करावी, असे अवाहन पुण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

माहिती प्रसिद्ध करणाऱ्यांवर पुणे पोलिसांचा सायबर सेलकडून लक्ष ठेवले जात आहे. तसेच, पुणे पोलिसांच्या सोशल मिडीया सेल ही करोनाबाबत आफवा पसरविणाऱ्या पोस्ट काढून टाकण्याबरोबरच त्या व्यक्तींची माहिती गोळा करत आहे. त्यामुळे खास करून व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या अडमीन देखील त्यांच्या ग्रुपवर कोरोनाबाबत खोटी माहिती टाकली जाणार नाही. याची काळजी घ्यावी. अन्यथा ग्रुप अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल केला जाईल, असे ही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान दरवर्षी 1 एप्रिलला एप्रिलफुल करण्यात येते. त्यापार्श्वभूमीवर देखील पोलिसांनी अफवा किंवा एप्रिलफुल करण्याच्या नादात भीती पसरेल किंवा कोरोनाबाबत खोटी माहिती प्रसिद्ध होऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.