पॅन्गाँग सरोवराजवळ तणावात भर, सीमेवर भारतीय बोफोर्स तैनात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   एका बाजूला चर्चा सुरु असतानाच भारत-चीनच्या सीमेवर दोन्ही देशांचं लष्कर आमने सामने आल्याचे चित्र आहे. वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) चीनकडून दगाबाजीचा धोका असल्यानं भारतीय सेनेकडून आता 155 मिमी होवित्झर तोफा तैनात करण्यात आल्यात. उल्लेखनीय म्हणजे रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये गुरुवारी (दि.10) रात्री भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चिनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात बैठकीत पाच मुद्यावर दोन्ही पक्षांची सहमती झाल्याचे सांगण्यात आलं होते. तसेच दोन्ही देशांकडून मोकळेपणाने चर्चा आणि चर्चेतून मार्ग काढण्यासंबंधी चर्चाही झाली होती.
पॅन्गाँग सरोवराजवळ चिनी सेनेकडून आपली ताकद वाढवल्याचं लक्षात आल्यानंतर भारतीय लष्करानं सीमेवर बोफोर्स तोफा तैनात करण्याचं महत्त्वाचं पाऊल उचललंय. सध्या 40 हजार भारतीय सैनिक या ठिकाणी तैनात आहेत. वायुसेनाही सज्ज आहे त्यातच होवित्झर तोफा सीमेवर पाठवण्यात येत आहेत. भारतीय सेनेतील सुत्रांच्या माहितीनुसार, ऑगस्टच्या शेवटी उंचावरील क्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी पॅन्गाँग सरोवराच्या दक्षिणेपासून ऑपरेशन सुरु करण्यात आलं होतं.

दरम्यान, भारत चीन ताणावाच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) अकरा वाजता एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री बिपीन रावत, सेना प्रमुख एम एम नरवणे हे देखील उपस्थित राहणार आहेत. चीन प्रश्नासंबंधी रणनिती आखण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.