पुणे पदवीधरमध्ये सांगलीकरांमध्येच होणार ‘लढत’ !

सांगली : पोलिसनामा ऑनलाइन – विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात अनेक राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपने संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने गतवेळची चूक सुधारत अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे देशमुख आणि लाड या दोन्ही सांगलीकरात चुरस पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जनता दलाचे माजी आमदार शरद पाटील हेही सांगलीचेच आहेत. त्यामुळे यावेळी पुणे पदवीधरमध्ये सांगलीकरांच्यातच लढत पाहायला मिळणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ हा पुणे महसुली विभागातील पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत विभागला गेला आहे. आजपर्यंत भाजपने हा गड आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. आतापर्यंत या मतदारसंघातून उमेदवारी देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील क्रियाशील कार्यकर्त्यांचाच प्राधान्याने विचार केला होता. गतवेळी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकीय चळवळीत कार्यरत असलेल्या चंद्रकांत पाटील यांना संधी दिली होती. मात्र, भाजपने यावेळी प्रथमच रा. स्व. संघाबाहेरील संग्रामसिंह देशमुख यांना मैदानात उतरविले आहे.

क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांना गेल्या वेळीही पक्षाची उमेदवारी मिळेल याची खात्री वाटत होती. त्यामुळे त्यांनी मतदार नोंदणीपासूनच तयारी केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी सारंग पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने त्यांनी बंडखोरी केली. लाड यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा विजय सुकर झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीने यावेळी अरुण लाड यांना उमेदवारी देऊन चूक सुधारली आहे.

एके काळी पुणे पदवीधरमधून प्रकाश जावडेकरांसारख्या दिग्गजांचा पराभव करून तिसऱ्या आघाडीतून जनता दलाचे प्रा. शरद पाटील यांनीही विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले होते. याहीवेळी समाजवादी चळवळीचे मतदार समोर ठेवून जनता दलाचे प्रा. शरद पाटील हेही मैदानात उतरले आहेत. जिल्ह्यातील या तीन उमेदवारांसह आपच्या वतीने डॉ. अमोल पवार, भाकपतर्फे कॉ. शंकर पुजारी, वंचित आघाडीतून प्रा .सोमनाथ साळुंखे हेही मैदानात उतरले आहेत. एकू णच सांगलीकर उमेदवारांमधील लढत चुरशीची होईल हे मात्र नक्की.

विजयाची भिस्त कोल्हापूर आणि सांगलीवर
पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये सुमारे ५ लाख मतदार आहेत. यापैकी सर्वाधिक नोंदणी कोल्हापूरमधून १ लाख, तर सांगलीतून ८६ हजार इतकी झाली आहे. यामुळे या जिल्ह्यातूनच या मतदारसंघाचे भवितव्य निश्चित होणार आहे.

काँग्रेसची भूमिका निर्णायक
पलूस-कडेगावचे प्रतिनिधित्व राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत संग्राम देशमुखांनी कदमांना पुढे चाल दिली. त्यामुळे देशमुखांची परतफेड या निवडणुकीतून करण्याची संधी आहे. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीचा मित्रपक्ष आहे, त्यामुळे काँग्रेसची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.