प. बंगलामध्ये भाजपाच्या पराभवासाठी औवेसी पुढं आले, ममता बॅनर्जींकडे मैत्रीचा हात

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाइन – बिहारनंतर आता पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींच्या (mamata-banerjee) तृणमूल काँग्रेसकडून सत्ता खेचण्याचे भाजपचे स्वप्न आहे. त्यासाठी भाजपने आता मिशन पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी प्लॅनिंग सुरू केली आहे. यासाठी भाजपने पश्चिम बंगालचे पाच विभाग तयार करून प्रत्येकाची जबाबदारी एका नेत्याकडे निश्चित केली आहे, तर दुसरीकडे एआयएमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (asauddin-owaisi) यांनीही बिहारनंतर आपला मोर्चा बंगालच्या दिशेने वळवला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत मात्र काही झाले तरी ममता बॅनर्जी यांच्या हातून सत्ता खेचून आणायचीच असा चंग भाजपने बांधला आहे, तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी एमआयएमच्या ओवेसी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे दोस्तीचा हात पुढे केला आहे. निवडणुकांपूर्वी आघाडी करण्यास उत्सुक आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आमच्याकडून तृणमूल काँग्रेसला मदत करण्यात येईल, असे ओवेसी यांनी म्हटले आहे. बिहारमधील सिमांचल भागात 5 जागांवर विजय मिळवल्यानंतर एमआयएमच्या पक्षाचा आणि नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळेच पश्चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये आपण उमेदवार उभे करणार असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे. त्यासाठी, एमआयएमची नजर अल्पसंख्याक समुदाय असलेल्या मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तरी दिनाजपूर येथे आहे.

एमआयएम तृणमूलसाठी धोक्याची घंटा
बंगालमधील निवडणुकांत एमआयएमचा प्रवेश हा ममता बॅनर्जींच्या टीएमसीसाठी धोक्याची घंटा असल्याचे टीएमसीला वाटत आहे. कारण, यंदा भाजप विरुद्ध टीएमसी असा थेट सामना रंगणार आहे, तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांची लढाईसुद्धा तृणमूलसोबतच आहे. त्यामुळे ओवेसीचा एमआयएम पक्ष थेट निवडणुकांच्या रिंगणात उतरल्यास त्याचा फटका तृणमूलाच होणार आहे.

5 नेत्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप
भाजपने आखलेल्या रणनीतीनुसार सुनील देवधर यांच्याकडे हावडा, हुगळी आणि मिदनापूर या विभागाची जबाबदारी असेल. विनोद तावडे हे नाबादीपमध्ये निवडणुकीची तयारी पाहतील. विनोद सोनकर यांच्याकडे बर्दमान तर हरीश द्विवेदी यांच्याकडे उत्तर बंगालची जबाबदारी सोपवली आहे. हे चारही नेते भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत. याशिवाय भाजपचे महासचिव दुष्यंत गौतम यांना कोलकाता विभागाचे निवडणूक प्रभारी केले आहे. हे पाचही नेते नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत निवडणुकीच्या तयारीचा अहवाल तयार करून पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना सादर करणार आहेत. या अहवालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पश्चिम बंगालचा दौरा करण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय हेच पश्चिम बंगाल राज्याचे प्रभारी असतील.

भाजपला केवळ 3 जागा
गेल्या निवडणुकीत टीएमसीला सर्वाधिक 211, काँग्रेसला 40, डाव्या पक्षांना 26, भाजपला केव‌ळ 3 जागा मिळाल्या होत्या. सत्तास्थापनेसाठी राज्यात 148 जागांची आवश्यकता असते.