अकोले : ‘ED’ प्रकरणात अशोक भांगरे यांचा शरद पवारांना पाठिंबा

अकोले (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी अकोले तालुक्याचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे व सुनीता भांगरे यांनी मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात उपस्थित राहून शरद पवारांना अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाठिंबा दर्शविला.

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजप सरकारने जाणीवपूर्वक शरद पवार यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीची भिती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता शरद पवार यांच्या समर्थनार्थ पुढे येत आहे. याचाच परिपाक म्हणून आज अकोले शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर अकोले तालुक्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मुंबई येथे शरद पवारांना समर्थन दिले.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक भांगरे व जिल्हा परिषद सदस्या तथा राजूर प्रकल्पाच्या अध्यक्षा सुनीता भांगरे यांनी मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात उपस्थित राहून शरद पवारांना अकोले तालुक्याच्या वतीने पाठिंबा दिला. कट्टर पिचड विरोधक डॉ.किरण लहामटे हे देखील आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुंबईत दाखल झाले असून त्यांनीही शरद पवार यांना पाठिंबा दर्शविला आहे. मुंबईत अशोक भांगरे यांनी कोण आला रे कोण आला मोदी शहाचा बाप आला, असे म्हणत शरद पवार यांची पाठराखण केली. अकोले शहरात आज सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेऊन या बंदला पाठिंबा दिला.

यावेळी अकोले बसस्थानकाजवळ निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. जेष्ठ नेते दशरथ सावंत, संपत नाईकवाडी, राम चौधरी, संदीप शेणकर, राम एखंडे यांच्यासह आदींनी यावेळी भाजप सरकारचा निषेध करीत शरद पवारांना पाठिंबा दिला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ईडीला हाताशी धरून भाजपाने शरद पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असल्याची ग्रामीण भागात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागात ही शरद पवारांप्रती सहानुभूतीचे वातावरण तयार झाले आहे.

Visit : policenama.com