Coronavirus : पाकिस्तानात एकाच दिवसात दुप्पट झाले रूग्ण, ‘कोरोना’ ग्रस्तांची संख्या 130 पार

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानात कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. येथे एका दिवसातच कोरोना व्हायरसचे दुप्पट रूग्ण सापडले आहेत. 83 नव्या रूग्णांसह सोमवारी सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत पाकिस्तानात कोरोना व्हायरसच्या एकुण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 136 झाली आहे. यातील 134 केस अ‍ॅक्टिव्ह आहेत तर 2 रूग्ण बरे झाले आहेत.

यापूर्वी पाकिस्तानात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले 53 रूग्ण होते, परंतु 83 नवीन रूग्ण सापडल्याने आकडा दुप्पट वाढला आहे. दक्षिण आशियात पाकिस्तान सर्वात जास्त कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह रूग्णांचा देश बनला आहे. येथील केवळ सिंध प्रांतात सोमवारी कोविड-19 चा संसर्ग झालेले 50 नवे रूग्ण सापडले.

डॉन न्यूजने सिंध सरकारचे प्रवक्ते बॅरिस्टर मुर्तजा वहाब यांच्या ट्विटचा संदर्भ देत म्हटले आहे की, राज्यात 50 अन्य लोकांना कोविड-19 चा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व जियारती होते आणि पाकिस्तान-इराण सीमेवरून सुकुर ताफ्तानला गेले होते. एकुण समोर आलेल्या प्रकरणांमध्ये 25 कराची, तर एक हैद्राबाद (पाकिस्तान)मधील आहे.

पाकिस्तानचा शेजारी देश इराणमध्ये कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या 14,991 (1053 नवे रूग्ण, 4590 रिकव्हर, 853 मृत्यू, 9548 अ‍ॅक्टिव्ह) आहे, अफगाणिस्तानमध्ये 21 (5 नवे रूग्ण, 1 रिकव्हर, 20 अ‍ॅक्टिव्ह), चीनमध्ये 80,880 (36 नवे रूग्ण, 67819 रिकव्हर, 3213 मृत्यू, 9848 अ‍ॅक्टिव्ह) आणि भारतात 129 (15 नवे रूग्ण, 13 रिकव्हर, 2 मृत्यू, 114 अ‍ॅक्टिव्ह) रूग्ण आहेत.