‘कोरोना’च्या संकटात देखील ‘या’ कंपनीने घेतला पगारवाढीचा निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन – देशातील अनेक कंपन्यांना लॉकडाउनचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे अगदी कामगारकपातीपासून ते पगारकपातीपर्यंतचे वेगवेगळ्या पर्यायांच्या माध्यमातून पैसे बचत करण्याकडे कंपन्यांचा कल आहे. अशातच एशियन पेंट्सने मात्र कर्मचार्‍यांना घसघशीत पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी रंग निर्मिती कंपनी असणार्‍या एशियन पेंट्सने या कठीण प्रसंगामध्ये कामगारांचा उत्साह वाढवण्यासाठी पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

एशियन पेंट्सने आपल्या सेल्स विभागातील कर्मचार्‍यांसाठी रुग्णालयाचा खर्च, विमा कवच अशा सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर रंगांची विक्री करणार्‍या दुकानांमध्ये म्हणजेच पार्टनर स्टोअर्समध्ये स्वच्छेतेचे पालन कडेकोटपणे केले जाईल यासंदर्भातही काळजी घेण्यासाठी कंपनीने विशेष व्यवस्था केली आहे. यासाठी कंपनीने कॉन्टॅक्टर्सच्या खात्यांवर 40 कोटी रुपये जमा केले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी अमित सिंघल यांनीे बाजारपेठेमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना कंपनीने पुढे येऊन त्यांच्या कर्मचार्‍यांना वाटत असणार्‍या चिंतांबद्दल विचार करणे गरजेचे आहे. आम्ही केवळ कामावर घ्या आणि कामावरुन काढू टाका या उद्योगात नाही. आम्ही एक प्रगल्भ ब्रॅण्ड आहोत. या अशा कठीण प्रसंगी आम्ही सर्व कर्मचार्‍यांना विश्वास देऊ इच्छितो की आपण सर्व या संकटात एकत्र आहोत. एशियन पेंट्सने करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम केअर्ससाठी आणि मुख्यमंत्री मदतनिधीसाठी 35 कोटी रुपये दिले आहेत. तसेच कंपनीने करोनाविरुद्धच्या संकटात देशातील सॅनिटायझर्सची मागणी लक्षात घेता सॅनिटायझर्स बनवण्यास सुरुवात केली आहे.