प्रेम प्रकरणातून 52 वर्षीय महिलेवर खुनी हल्ला, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलीसनामा ऑनलाईन : प्रेम प्रकरणातील संबंध तोडल्याने एका 55 वर्षीय प्रियकराने 52 वर्षीय महिलेवर धारधार शस्त्राने हल्ला करून स्वतः आत्महत्या (attack-on-52-year-old-woman-over-love-affair-boyfriend-suicide-attempt) करण्याचा प्रयत्न केला. नालासोपारा परिसरात ही घटना घडली. दोघेही जखमी असल्याने त्यांचावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी प्रियकरावर नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महेश मोहन रेवर (वय 55) असे आरोपीचे नाव आहे. भावना खिमजी नागर (वय 52) असे हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिमेच्या पांचाळ नगर परिसरात राहणाऱ्या भावना नागर यांची दोन वर्षांपूर्वी आरोपी महेश सोबत फेसबुकद्वारे ओळख होऊन मैत्री झाली. या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले होते. पण मागील काही दिवसापासून भावना महेशला टाळत होती. याचा राग मनात धरून आरोपी हा शुक्रवारी भावनाच्या घरात घुसून चाकूने गळ्यावर, छातीवर, हातावर आणि पोटावर सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. तर आरोपीनेही त्याच चाकूने स्वतःच्या पोटावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संभाजी मुंडे यांनी सांगितले की, महिलेला उपचारासाठी जेजे रुग्णालय मुंबई येथे दाखल केले असून तिची प्रकृती ठीक आहे. तर आरोपी महेशवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नालासोपारा पोलीस तपास करत आहेत.