दौंड खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला, माजी सभापतीसह सहाजनांवर गुन्हा दाखल

दौंड : अब्बास शेख – दौंड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष लक्ष्‍मण पांडुरंग दिवेकर यांच्यावर माजी पं.स.सभापती शिवाजी रामभाऊ दिवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना दौंड तालुक्यातील कडेठाण येथे घडली आहे.

यवत पोलिसांनी माजी सभापती शिवाजी दिवेकर यांच्यासह सागर पूर्णनाव माहीत नाही, हनुमंत दिवेकर, सतीश कोऱ्हाळे, ज्ञानदेव कोऱ्हाळे, शहाजी दिवेकर यांच्यावर  बेकायदा जमाव जमवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत घडलेली हकीकत अशी कडेठाण गावची यात्रा हि  रविवार आणि सोमवार या दोन दिवस चालू होती. सोमवार दिनांक २९ रोजी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास लोकनाट्य तमाशा सुरू झाला. या वेळी लक्ष्मण दिवेकर तमाशा पाहण्यासाठी  बसले असताना रात्री साडे नऊच्या सुमारास त्यांच्या जवळ शिवाजी दिवेकर आणि त्यांचे सहकारी आले आणि अचानक धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला चढवला यावेळी लक्ष्मण दिवेकर यांनी डोक्यावरील वार चुकवण्यासाठी हात पुढे केल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या दंडाला सह बोटाला गंभीर जखम झाली यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या पाठीवर, डोक्यात, वार केले. हल्ला करून मारेकरी घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर लक्ष्‍मण दिवेकर यांना केडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती समजताच यवत चे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयास भेट दिली. यात्रेत झालेल्या  हल्‍ल्यानंतर या घटनेचे पडसाद गावात उमटले आहेत.