दरोडेखोरांचा ऑइल कंपनीच्या मालकासह कर्मचाऱ्यांवर कोयत्याने हल्ला

कुरकुंभ एम.आय.डी.सीतील भयानक प्रकार

एका चोरट्याकडून एका पिस्तुल आणि काडतुसे जप्त

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन अब्बास शेख – दौंड तालुक्यातील कुरकुंभ एम.आय.डी.सी.मध्ये असणाऱ्या पाटीदार ऑइल कंपनीवर तीन दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हल्ला केला या हल्ल्यामध्ये पाटीदार कंपनीचे मालक महेंद्र रत्नसी खांट आणि कामगार हेमंत परमार हे गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांना दौंड येथील खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. हल्ला करून पळून जात असताना एक दरोडेखोर तेथील कर्मचाऱ्यांच्या हाती लागला असून त्याचे नाव शाम बिसराम यादव असून तो उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक देशी पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पाटीदार कंपनीचे मालक महेंद्र खांट हे काल रात्री हॉटेलमध्ये जेवण करून आपल्या कंपनीच्या ऑफिसमध्ये येऊन बसले होते. त्यावेळी त्यांना कंपनीच्या आवरामध्ये तीन इसम उभे असल्याचे दिसून आले त्यांनी त्या इसमांजवळ जाऊन हटकले असता त्या ईसमांनी महेंद्र खांट यांना दोरीने बांधण्याचा प्रयत्न केला. यावेळी महेंद्र यांनी चोर-चोर अशी आरडा ओरड केल्याने त्यांच्या कंपनीतील कर्मचारी हेमंत परमार हा पळत आला त्यावेळी या दरोडे खोरांनी महेंद्र यांच्या पोटामध्ये कोयता मारून त्यांना जखमी केले.

तर हेमंत परमार हा जवळ आल्याने त्याच्या हाताच्या दंडावर आणि पोटावर या दरोडेखोरांनी कोयत्याने हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन दरोडेखोर हे कंपनीच्या भिंतीवरून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाले. परंतु तिसरा दरोडेखोर हा भिंती वरून उडी मारताना खाली पडून जखमी झाला. त्यास तेथील कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल आणि दोन काडतुसे सापडली असून अधिक तपास दौंड पोलीस करत आहेत.