Lockdown : उमारग्यात झोपलेल्या चिमुरडीच्या अपहरणाचा प्रयत्न

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस रस्त्यावर आणि नागरिक घरात आहेत. परिणामी चोरट्यांची गोची झाली आहे. अशातच लॉकडाउनमध्येही उमरगा शहरात एका सहा वर्षांच्या मुलीचा अपहरणाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेने कोरोनाच्या संकटात लॉकडाउनमुळे हैराण झालेल्या नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. झोपेत असलेल्या चिमुरडीला उचलून नेत असताना मुलीने आरडाओरडा केल्यामुळे अपहरणकर्ते तिला रस्त्यातच सोडून गेले.

उमरगा येथील रहिवाशी असलेले एक शिक्षक बाहेरील जिल्ह्यात नोकरीला आहेत. लॉकडाउनमुळे कुटुंबासह परत उमरगा येथे ते स्वगृही आलेले आहेत. 29 एप्रिलच्या रात्री जेवण करुन सर्व कुटुंबिय झोपी गेले होते. मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील सहा वर्षीय चिमुरडीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे कुटुंबीय जागे झाले. जवळच झोपलेली मुलगी न दिसल्याने त्यांनी बाहेर पाहिले असता ती त्यांना घराबाहेर रस्त्यावर दिसून आली. ती घाबरलेल्या अवस्थेत असल्याने कुटुंबियांनी तिला आधी झोपी घातले. झोपेतून जागी झाल्यावर विचारपूस केली असता ती झोपेत असताना कोणीतरी उचलून घेऊन जात असल्याचं तिने आई-वडिलांना सांगितले.

आरडाओरडा केल्यामुळे रस्त्यातच सोडून ते पळून गेल्याचेही तिने पालकांना सांगितले. त्यानंतर पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठून अपहरणकर्त्याविरूद्ध फिर्याद दिली. तत्पुर्वी 10 दिवसांपूर्वीही एका व्यक्तीने घरात प्रवेश करुन मोबाईल चोरुन नेला होता, असेही शिक्षकाने फिर्यादीत नमूद केले आहे. त्यावेळी देखील पोलीस ठाण्यात मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार देण्यात आली होती. आता चक्क चिमुरडीचेच अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे हे कुटुंब धास्तावले असून पोलिसांसमोर अज्ञात अपहरणकर्त्याचा शोध घेण्याचे आव्हान आहे.