हॉटेल बिलाच्या वादातून काँग्रेस नगरसेवकाला मारहाण

खुलतानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –   मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या काँग्रेस नगरसेवाकाचे आणि हॉटेल चालकामध्ये जेवणाच्या बिलावरुन वाद झाले. नगरसेवकाने हॉटेल चालकाला बिल कमी करण्यास सांगितले यावरुन झालेल्या वादातून नगरसेवक दिलीप बावस्कर यांना मारहाण करण्यात आली. ही घटना नंद्राबाद येथील औरंगाबाद रोडवरील पंचवटी हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी हॉटेल चालक कैलास पडघन, विशाल पडघन, नेताजी (संपूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसचे नगरसेवक दिलीप दौलतराव बावस्कर व त्यांचे मित्र सचिन विश्वनाथ भालेकर, अब्दुल वहीद अब्दुल हे नंद्राबाद येथील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील पंचवटी हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी मंगळवारी (दि.8) रात्री गेले होते. त्यांनी मेनूकार्ड पाहून जेवणाची ऑर्डर दिली. जेवण झाल्यावर मेनूकार्डवरील दराप्रमाणे नऊशे रुपये बिल घेण्यासाठी नगरसेवक बावस्कर यांनी आग्रह धरला.

त्यावेळी हे मेनुकार्ड जुने असून त्याप्रमाणे बिल लावता येणार नाही असे हॉटेल चालक पघडनने सांगितले. यावरुन दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. विशाल पडघन व नेताजी नावाच्या व्यक्तीने जातीवाचक शिवीगाळ करुन काचेची बाटली डोक्यात व हातावर मारून बावस्कर यांना जखमी केले. बावस्कर यांच्या सोबत आलेल्या मित्रांनी मध्यस्थी करुन भांडण सोडवलं. जखमी झालेल्या बावस्कर यांच्यावर खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.