मशिदीत नमाज अदा करण्याच्या भूमिकेवर खासदार जलील ठाम

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – विना परवानगी एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील हे मशिद उघडून नमाझ अदा करणार आहेत. मंदिर-मशिद प्रवेशावर खासदार जलील हे ठाम असल्यामुळे औरंगाबाद शहरात वातावरण तणावाचे झाले आहे.

यापूर्वीच खासदार जलील यांनी बुधवारी शहरातील शहागंज येथील मशिदीत प्रवेश करून नमाझ अदा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे शहागंज मशिदीजवळ पोलिस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते. मशीद परिसरात कुणालाही प्रवेश मिळणार नाही, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत आणि खासदार जलील हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

राज्यातील धार्मिकस्थळे खुली करण्याच्या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शहरातील खडकेश्वर महादेव मंदिरात प्रवेश करण्याचा इशाराही दिला होता. खासदार जलील मंदिरात प्रवेश करणार होते तेवढ्यात MIM मंदिर उघडण्याच्या आंदोलनाला शिवसेनेने विरोध दर्शविला. त्यामुळे जलील यांना आंदोलन मागे घ्य़ावे लागले. असे असले तरीही खासदार जलील हे मशिद उघडून नमाझ अदा करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.

1 सप्टेंबरला हिंदू मंदिर आणि 2 सप्टेंबरला मशिद उघडणार असल्याचा इशारा खासदार जलील यांनी मागील आठवड्यातच दिला होता. राज्यभरात करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी नाही. राज्यात अनलॉकचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील धार्मिकस्थळे बंदच राहाणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.