सणासुदीच्या काळात फटका ! ऑक्टोबरमध्ये वाहनांच्या विक्रीत 24 % घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ज्या प्रकारे वाहनांची विक्री दिसून आली होती, त्याप्रमाणे ऑक्टोबरमध्ये विक्री मोठया प्रमाणात होईल, अशी अपेक्षा होती. कारण ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या हंगामाच्या सुरुवातीला विक्री वाढण्याची अपेक्षा होती. परंतु गेल्या महिन्यात वाहन विक्रीत मोठी घट झाली आहे.

काही वाहन कंपन्यांनी केवळ प्रवासी वाहनांच्या विभागात चांगले परिणाम दिले आहेत. यात मारुती सुझुकी, ह्युदाई, टाटा मोटर्स आणि किआ मोटर्सच्या गाड्यांची विक्री चांगली झाली आहे, तर इतर कंपन्यांची विक्री कमी झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) च्या म्हणण्यानुसार ऑक्टोबरमध्ये प्रवासी कारच्या विक्रीत 8.8 टक्क्यांनी घट झाली आहे.

फाडाच्या आकडेवारीनुसार, प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री वर्षाच्या आधारावर ऑक्टोबरमध्ये 8.8 टक्क्यांनी घसरून 2,49,860 वाहनांवर आली आहे, तर एका वर्षापूर्वी ऑक्टोबर-2019 मध्ये प्रवासी कारची विक्री 2,73,980 वाहने होती. पुरवठा साखळी खंडित झाल्यामुळे वाहनांची नोंदणी मंदावली आहे.

जर आपण टूव्हीलर्स विक्रीबद्दल बोललो तर ऑक्टोबरमध्ये मोठी मागणी घटली आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये एकूण 10,41,682 दुचाकींची विक्री झाली, तर ऑक्टोबर 2019 मध्ये एकूण 14,23,394 दुचाकींची विक्री झाली. दर वर्षाच्या तुलनेत विक्रीत 26.82 टक्क्यांनी घट झाली आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार केवळ नवरात्रातच विक्रीत वाढ झाली आहे.

ऑक्टोबरमध्ये व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत सर्वाधिक घट झाली. गेल्या महिन्यात व्यावसायिक वाहनांची विक्री 30.32 टक्क्यांनी घटून 44,480 मोटारींवर आली आहे. वर्षभरापूर्वी याच काळात 63,837 वाहने विकली गेली. फाडा देशभरातील 1,464 प्रादेशिक परिवहन कार्यालयांपैकी 1,257 कार्यालयांकडून वाहन नोंदणी डेटा गोळा करते.

ऑक्टोबरमध्ये तीनचाकी वाहनांची विक्रीदेखील 64 64.5 टक्क्यांनी घसरून 22,381 वाहनांवर आली आहे. एक वर्षापूर्वी म्हणजे ऑक्टोबर-2019 मध्ये ही विक्री 63,042 युनिट्स होती. या काळात ट्रॅक्टरची विक्री 55 टक्क्यांनी वाढून 55,146 वाहनांवर गेली. एका वर्षापूर्वी याच महिन्यात ही विक्री 35,456 मोटारींची होती.

वास्तविक, ऑक्टोबरमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत वाढ होण्याची अपेक्षा होती. परंतु विक्री 23.99 ने घटली. मागील महिन्यात सर्व प्रकारच्या वाहनांची विक्री मागील वर्षाच्या तुलनेत 23.99 टक्क्यांनी घसरून 14,13,549 वाहनांवर आली आहे. एका वर्षापूर्वी म्हणजे ऑक्टोबर 2019 मध्ये ते 18,59,709 युनिट होते.