शिवसेनेनंतर भाजपला मनसेचा झटका, राम कदमांच्या समर्थकांचा मनसेत प्रवेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने मोर्चे बांधणी सुरु केली आहे. भाजपच्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेने धक्का दिला. यानंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भाजप आमदार राम कदम यांना जोरदार झटका दिला आहे. भाजप नेते सुनील यादव आणि राम कदम यांच्या समर्थकांनी मनसेत प्रवेश केला आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदार संघाताली अनेक कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे.

ठाणे आणि वसई विरार मधील शिवसेना-भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला. यामध्ये सुनील यादव, राम कदम यांच्या समर्थकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला.

मनसेत येणाऱ्यांची संख्या वाढली
शहापूर तालुक्यात ऑक्टोबरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत अनेक शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला. यापूर्वी कल्याण-डोंबिवली मधील शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपला मनसेने जोरदार झटका दिल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.

नांदेड, औरंगंबादमध्ये शिवसेना, काँग्रेसला मनसेचा झटका
जुन्या नांदेमध्ये शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी मनसेत प्रवेश केला. यामुळे नांदडमध्ये मनसेची ताकद वाढली आहे. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मनसे नांदेडमध्ये पक्ष बांधणी करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

मागील वर्षापासून औरंगाबादमधील शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. तर फेब्रुवारीमध्ये शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू सुहास दशरते यांनी मनसेत प्रवेश करुन शिवसेनेला धक्का दिला. यानंतर खैरे यांच्या अनेक विश्वासू कार्यकर्त्यांनी पुण्यात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.