‘बाबा रामदेव यांच्याकडे प्रत्येक आजारावर औषध, ते मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकतात’, ‘या’ मंत्र्यांचा जोरदार टोला

जयपूर : वृत्तसंस्था – अलीकडेच बाबा रामदेव यांचे कोरोनावरील औषध ‘कोरोनील’वरून वाद सुरु झाला आहे. आयसीएमआर आणि आयुष मंत्रालयाने त्याबाबत कडक भूमिका घेतली असून काही राज्यांनीही या औषधावर बंदी आणली आहे. यादरम्यान राजस्थानचे युडीएच मंत्री शांती धारीवाल यांनी बाबा रामदेव यांना जोरदार टोला लगावला आहे. ते म्हणाले की, बाबा रामदेव हे मेलेल्या माणसालासुद्धा बरे करू शकतात, त्यांच्याकडे तशा प्रकारचे औषध असेल.

धारीवाल म्हणाले की, ‘बाबा रामदेव यांच्याकडे प्रत्येक आजारावरील औषध उपलब्ध आहे. ते मेलेल्या माणसालासुद्धा जिवंत करू शकतात. त्या प्रकारचे औषधसुद्धा त्यांच्याकडे असू शकते.’ आता त्यांचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बाबा रामदेव यांनी कोरोना संक्रमण ‘कोरोनील’ या औषधाने पूर्णपणे बरे होत असल्याचा दावा केल्यानंतर त्यावरून वाद सुरु झाला. तसेच या औषधाची राजस्थानमध्ये वैद्यकीय चाचणी झाली आहे का यावरूनही आता वाद निर्माण झाला आहे. याअगोदर राजस्थानचे आरोग्य मंत्री रघू शर्मा यांनीही या औषधाबाबत आपले मत व्यक्त केले होते.

त्यामुळे या औषधावरून बाबा रामदेव यांची अडचण वाढली आहे. दरम्यान त्यांच्यासोबत असणारे निम्स विद्यापीठाचे मालक आणि चेअरमन बी.एस. तोमर यांनीही बाबा रामदेव यांचा पाठिंबा सोडला आहे. त्यांनी आपल्या रुग्णालयात कोरोनाच्या औषधाची कुठलीही वैद्यकीय चाचणी झाली नसल्याचा दावा केला आहे.