‘ठाकरे’च्या निमित्ताने सेना – भाजपाचे मनोमिलन ?

मुंबई : वृत्तसंस्था – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनवर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटा विषयी सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला संपूर्ण देशभर प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही होत आहे. पण रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांसाठी आयोजित करण्यात येईल अशी माहिती ‘ठाकरे’चे निर्माते आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. दिल्लीत या शोचे आयोजन करण्यात येईल आणि यावेळी सेना-भाजपातील अनेक राजकीय नेते उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात किंवा संसदेतील थिएटरमध्ये स्पेशल शोचं आयोजन करण्यात येईल अशी माहिती संजय राऊत यांनी एका वृत्तपत्राला दिली. मात्र याची तारीख आणि वेळ अजून निश्चित व्हायची आहे असंही राऊत म्हणाले. परंतु राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगत आहे की सेना – भाजपा यांच्या मधील दुरावा मिटवण्यासाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले आहे. पण या स्पेशल स्क्रीनिंगला मुख्यमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार का हे पाहण्यासारखं ठरले.

काही दिवसापूर्वी ‘ठाकरे’चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. हा चित्रपट मराठी हिंदी भाषेत प्रदर्शित होणार असून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारणार आहे. सामान्य माणूस ते असामान्य नेता असा बाळासाहेबांचा प्रवास याचित्रपटातून दाखवण्यात येणार आहे.