दौंड तालुक्यातील अवैध वाळू उपश्यावर बारामती गुन्हे शाखेची कारवाई, 58 लाख रुपयांचा माल जप्त, 14 जणांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड तालुक्यातील खानोटा येथे भीमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपश्यावर बारामती गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. त्यामुळे दौंड तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तब्बल 58 लाखांचा ऐवज जप्त करत 14 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अजीज हजरत शेख, रवसन हिजबुल शेख, बबलू मन्नान शेख, मोहम्मद नूर सलीम शेख, सराफत मुस्तफा शेख, संयुब नूरज शेख आणि मोहम्मद सबिक शेख (सर्व रा. झारखंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या वाळू माफिया बोटींचे मालक संतोष बाळासाहेब भोसले, पप्पू कवडे, मारुती शिंदे, दत्ता गायकवाड, प्रशांत उर्फ पप्पू गायकवाड, बाबू कुमार भोसले व शंकर कवडे हे पसार झाले आहेत. त्यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खानोटा येथे भीमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत आहे. वाळू उपश्याची कोणतीही परवानगी नाही. वाळूची पुणे जिल्ह्यात तस्करी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, बारामती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाने माहिती घेऊन अचानक छापा टाकला.

7 फायबर बोटी, तसेच 16 लहान बोटी आणि इतर साहित्य असे एकूण 58 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, येथील 7 कामगारांना अटक केली. तर, त्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर मालक पसार झाले. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/