बारामतीची उमेदवारी जानकरांनाच; परंतु भाजपचा कमळ चिन्हाचा आग्रह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्याचे दुग्धविकास आणि पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांना बारामतीची उमेदवारी देण्यासाठी भाजप अनुकल आहे. परंतु त्यांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची भाजपने अट टाकली आहे. तर भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास महादेव जानकर यांनी मात्र इन्कार केला आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जानकर कमळ चिन्ह घ्यायला नकार देत असल्यानेच बारामतीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपला वेळ लागत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणे प्रमाणे भाजप मित्र पक्षाला एक जागा सोडणार आहे. त्यामुळे ती एक जागा बारामतीचीच असणार आहे, असे चित्र सध्या राजकीय पटलावर दिसते आहे. महादेव जानकर बारामती प्रमाणे माढ्यासाठी देखील आग्रही होते. मात्र काल बुधवारी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना तेथून उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जाते आहे.

बारामती मतदारसंघातून आमदार राहुल कुल यांच्या मातोश्री रंजना कुल यांच्या नावाचा देखील भाजपमध्ये विचार सुरु होता. परंतु सध्या महादेव जानकर हे बारामती मतदारसंघासाठी सरस उमेदवार ठरतील अशी अटकळ भाजपच्या गोटात बांधली जात आहे. त्यामुळे काही हि करून महादेव जानकर यांना कमळ चिन्ह घ्यायला लावायचे असा चंग भाजप नेत्यांनी बांधला आहे. जानकरांनी भाजप आपणालाच उमेदवारी देईल असा विश्वास व्यक्त केला आहे. मागील लोकसभेला महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना चांगलीच लढत दिली होती. त्यामुळे भाजपने यावेळी त्यांनाच या जागेवर उमेदवारी देण्याची तयारी सुरु केली आहे.