दौंडमध्ये मताधिक्य देण्यावरून कुल-थोरातांची ‘प्रतिष्ठा’ पणाला

दोन्ही गटांचा मताधिक्याचा दावा

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – लोकसभा निवडणुकीत खा.सुप्रिया सुळेंच्या विरोधात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल उभ्या राहिल्याने दौंडमध्ये मताधिक्य देण्यावरून कुल आणि थोरात गटामध्ये चढाओढ लागली आहे.
आमदार राहुल कुल यांच्या गटाने दौंडमधून किमान तीस ते चाळीस हजारांचे मताधिक्य गृहीत धरले आहे तर राष्ट्रवादीच्या थोरात गटाने येथे सुळेंना कमीत कमी पंचवीस हजारांचे लीड देण्याचा चंग बांधला आहे.

दौंड हे आपले माहेरघर असल्याचे जेष्ठ नेते शरद पवार आपल्या भाषणांमधून कायम सांगत असतात. दौंडने आपल्याला भरभरून प्रेम दिले आहे त्यामुळे दौंड हे कायम आपल्या सोबत असल्याचे ते सांगत असायचे. परंतु दौंडचे दिवंगत आमदार सुभाष कुल यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतील राहुल कुल आणि रमेश थोरात या दोन प्रबळ गटांचा वाद इतका विकोपाला गेला कि 2004 साली थोरतांनी राष्ट्रवादीशी बंड करत विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळी राष्ट्रवादीच्या रंजना कुल या निवडून आल्या परंतु त्यानंतर झालेल्या 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत राहुल कुल यांचा रमेश थोरात यांनी अपक्ष उभे राहून पराभव केला त्यावेळी राहुल कुल यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती.

2014 साली मात्र रमेश थोरात यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने राहुल कुल यांनी राष्ट्रवादीशी बंड करत रासप कडून उभे राहून रमेश थोरातांना पराभूत केले. त्या दिवसापासून कुल हे राष्ट्रवादी पासून विभक्त झाले ते आजपर्यंत.

एका पक्षातील हा विरोध आता इतका वाढला कि कुलांनी भाजपकडून लोकसभेचे तिकीट घेतले आहे आणि आता थेट त्यांनी पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंनाच आव्हान दिले आहे. बारामती विभागाच्या लोकसभा मतदानाला जेमतेम पंचवीस दिवस बाकी राहिले आहेत. सुळे यांचा दौंड दौरा संपताच कुल यांनीही दौंडमध्ये प्रचार दौरा सुरू करून शक्ती प्रदर्शन केले आहे. त्यामुळे दौंडमध्ये कुल आणि थोरात गटामध्ये आता मताधिक्यावरून मोठी चढाओढ सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

मिनी विधानसभा म्हणून पाहिल्या जात असलेल्या या निवडणुकीला स्थानिक उमेदवार असलेल्या कांचन कुल यांच्या गटाला खरोखरच दौंडमधून पन्नास हजारांचे मताधिक्य मिळवता येईल का आणि थोरात गट कुलांचे आव्हान मोडून काढत पंचवीस हजारांचे मताधिक्य घेईल का हे लवकरच समजणार आहे.