बारामती सुपे, वडगाव मावळ येथून मोटरसायकली चोरी करणारी टोळी जेरबंद

दौंड – (पोलीसनामा ऑनलाइन) अब्बास शेख – पुणे जिल्ह्यातील बारामती, वडगावमावळ यांसह विविध तालुक्यांत दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून त्यांच्या कडून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २१.१२.२०१८ रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीतील ४ आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून बुलेटसह एकूण ४ मोटरसायकल हस्तगत केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट यांनी दिली.

पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे आदेशाने दि.१ जानेवारी रोजी पेरणेफाटा विजयस्तंभ येथे होणारे कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे जिल्हयात स्थानिक गुन्हे शाखेची पथके नेमण्यात आलेली आहेत.

त्याप्रमाणे एलसीबी शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले पोलीस उपनिरीक्षक जीवन राजगुरू, दयानंद लिम्हण, चंद्रकांत झेंडे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, शब्बीर पठाण, दत्ता तांबे, चंद्रशेखर मगर, अक्षय नवले यांचे पथकास दिनांक २१.१२.२०१८ रोजी पुणे-नगर रोडवर पेट्रोलिंग करीत असताना एका बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कोरेगाव भिमा बाजार मैदान येथे ४ जण मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहेत.

अशी खात्रीशीर बातमी मिळालेनंतर गुन्हे शाखेचे पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून बिगरनंबरचे मोटरसायकलवर संशयास्पदरित्या थांबलेले आरोपी नामे १) गणेश यादव गायकवाड वय २६ रा.वनकुटे ता.पारनेर जि.अहमदनगर २) अहमद हसमुद्धिन शेख वय २१ रा.पिंपळगाव तुर्क ता.पारनेर जि.अहमदनगर ३) मयुर बाळासाहेब किनकर वय २२ रा.किनी पारनेर जि.अहमदनगर. सध्या रा.शिक्रापूर जि.पुणे ४) सौरभ बन्सी गुळवे वय २३ रा.रहिमपूर ता.संगमनेर जि.अहमदनगर  सध्या रा.शिक्रापूर जि.पुणे यांना त्यांचे ताब्यातील बुलेट, पल्सर, स्प्लेडर प्रो व सुझुकी ऍक्सेस अशा एकूण किंमत रूपये २,१८,०००/- च्या चार मोटरसायकलसह ताब्यात घेऊन मोटरसायकलबाबत त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता  त्यांनी त्या सुपे ता.बारामती, आंबेवाडी कान्हे, वडगाव मावळ येथून चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. त्याबाबत वडगाव मावळ व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपींना पुढील कारवाईकामी वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. अटक आरोपींकडून आणखीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून अधिक तपास वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके हे करीत आहेत.