लाच स्विकारणाऱ्या महिला तलाठी, कोतवाल यांना पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जमिनीची सात बार्‍यावर नोंद करण्यासाठी ५० हजाराची लाच घेणार्‍या मुळशी तालुक्यातील भूगांवच्या महिला तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई  करण्यात आली होती. या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कारवाई केली आहे. ही कारवाई पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण, उपाधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती.

मनिषा सर्जेराव पवार (37) आणि विठ्ठल गुलाब सुर्वे (37) असे महिला तलाठी आणि कोतवालाचे नाव आहे. तक्रारदार यांचे क्षेत्र व वारसा नोंदीचे प्रकरणात तहसिलदार मुळशी यांनी दिलेल्या आदेशानुसार नांव नोंद व क्षेत्र नोंद करून सात बारा पत्रकी नोंदी घेण्यासाठी मनिषा पवार आणि विठ्ठल सुर्वे यांनी 50 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. प्राप्‍त झालेल्या तक्रारीची नोंद करण्यात आली. त्यामध्ये पवार आणि सुर्वे हे लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले. त्यानंतर गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाचे पोलिस निरीक्षक घनशाम बळप आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सापळा रचुन पवार आणि सुर्वे यांच्यावर कारवाई केली.

शासकीय लोकसवेकाने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा अन्यथा 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, पोलिस उपाधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी करीत आहेत.