मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती अनाकलनीय आहे. याप्रश्नी राज्य सरकारचा न्यायालयीन लढा सुरूच राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असून मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मराठा आरक्षणाला कायम राखण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्यात राज्य सरकार कुठेही कमी पडलेले नाही. मराठा आरक्षणविषयी न्यायालयीन लढ्यात मागील सरकारने दिलेले वकील कायम ठेवत त्यांना अतिरिक्त वकील देण्यात आले होते. तसेच इतर राज्यांप्रमाणे मराठा आरक्षणाची सुनावणी मोठ्या पीठासमोर व्हावी अशी मागणी राज्याने केली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करताना मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस अंतरिम स्थगिती दिली.

इतर राज्यांच्या बाबतीत मोठ्या पीठासमोर जाताना आरक्षणाला अशी स्थगिती दिलेली नाही,’ याकडे लक्ष वेधत या अंतरिम स्थगितीबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘न्यायालयाच्या या निकालावर काय करता येईल यासाठी राज्य सरकार विचार करीत असून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोलणे झाले आहे. त्यांनी देखील यात कुठलेही राजकारण न आणता सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘आपण आतापर्यंत एकजुटीने लढलो आहोत. ती एकजूट तोडू नका. मराठा समाजाने संयम बाळगावा,’ असे आवाहन ठाकरे यांनी केले.