किराणा दुकानांवर वर्चस्व मिळवण्याची लढाई ! JioMart ला ‘आव्हान’ देण्यासाठी Amazon चे ‘लोकल’ शॉप्स

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   भारतातील जवळपास ७ कोटी किराणा दुकाने येत्या काही दिवसांत वर्चस्वासाठी रणांगणात रूपांतरित होणार आहेत. या दुकानदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रिलायन्स जिओने जिओ मार्ट लाँच केले आहे, त्यामुळे आता लॉकडाऊन दरम्यान Amazon इंडियाने ‘लोकल शॉप्स ऑन ऍमेझॉन’ प्रोग्राम लाँच केला आहे.

काय म्हणाले ऍमेझॉन…

ऍमेझॉन इंडियाने रविवारी स्थानिक दुकानदार आणि किराणा विक्रेत्यांसाठी ‘लोकल शॉप्स ऑन अ‍ॅमेझॉन’ प्रोग्राम लाँच केला. एका वृत्तसंस्थेनुसार, अ‍ॅमेझॉन इंडियाच्या सेल्स सर्व्हिसचे उपाध्यक्ष गोपाल पिल्लई यांनी या कार्यक्रमाची घोषणा करत सांगितले की, ‘लोकल शॉप्स ऑन ऍमेझॉन’च्या माध्यमातून देशातील प्रत्येक विक्रेत्याला भारत आणि जगातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

छोटे दुकानदार आणणार ई-लाला

खरतर काही दिवसांपूर्वीच, किराणा दुकानदारांच्या संघटनेच्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने पोर्टल ‘ई-लाला’ सुरू करण्याची घोषणा केली होती. सुमारे ७ कोटी दुकानदार आणि ४०,००० व्यापारी संघटना या संस्थेशी संबंधित आहेत. या प्रकल्पातून ग्राहकांना लॉकडाऊन दरम्यान जवळच्या दुकानातून सामान घरापर्यंत पोचवता येईल यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

अ‍ॅमेझॉनचे म्हणणे आहे की त्यांचा प्रोग्राम स्थानिक दुकानं आणि किराणा विक्रेत्यांना समर्थ करेल, जेणेकरून ते विद्यमान संसाधने आणि मालमत्ता वापरुन मोठ्या ग्राहक आधाराचा फायदा घेऊ शकतील. यासाठी कंपनीने एक खास ‘डिलिव्हरी अ‍ॅप’ तयार केले आहे.

कंपनी गेल्या सहा महिन्यांपासून या प्रोग्राम अंतर्गत जवळजवळ ५००० पेक्षा जास्त स्थानिक दुकानं आणि ऑनलाइन रिटेलरसह बंगळुरु, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, पुणे, जयपूर, अहमदाबाद, कोईम्बतूर, सूरत, इंदूर, लखनऊ, सहारनपूर, फरीदाबाद, कोटा आणि वाराणसी इत्यादी शहरांमध्ये एक पायलट प्रकल्प चालवत होती.

देशात आधीपासूनच ऍमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या परदेशी कंपन्यांच्या मालकीच्या पोर्टलवरून किराणा सामान आणि इतर वस्तूंची ऑनलाईन डिलिव्हरी होत आहे.