खळबळजनक ! सख्या भावाने केला भावाचा निर्घृण खून

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – प्लॉटच्या वादातून लहान भावाने सख्या मोठा भावाचा धारधार हत्याराने निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे सोमवारी (दि.8) रात्री आठ वाजता ही घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून सख्खा भाऊ पक्का वैरी ठरला आहे.

शेख इर्शाद शेख शकील असे खून झालेल्याचे नाव आहे. तर शेख अर्षद शेख शकील असे अटक केलेल्या भावाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे मुख्य रस्त्यावर शेख शकील यांची जागा आहे. या जागेवरून शेख अर्षद व शेख इर्शाद या दोन भावांमध्ये गेल्या काही दिवापासून वाद सुरु होता. या वादाचे रूपांतर सोमवारी रात्री भांडणात झाले. लहान भाऊ अर्षद याने त्याचा मोठा भाऊ इर्शाद याला तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केले. जखमी अवस्थेत माजलगाव रूग्णालयात दाखल केले असता इर्शादचा मृत्यू झाला.

दरम्यान या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. माजलगाव पोलीस तपास करत आहेत.