बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचा कोब्रासोबतचा व्हिडीओ ‘व्हायरल’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – साप हा शेतकर्‍यांचा मित्र असतो, शेतातील धान्याची नासाडी करणार्‍या अन्य प्राण्यांवर वचक ठेवण्यासाठी शेतकर्‍याला त्याची अधिक मदत होत असते. त्यामुळे सापाला न मारता सर्प मित्राच्या मदतीने पकडून जंगलात सोडून द्यावे, असे आवाहन करणारा जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचा एक मिनिट ७ सेकंदाचा व्हिडिओ सध्या बीड जिल्ह्यात व्हायरल होत आहे. सदरचा व्हिडिओ हा मालेगाव येथील असल्याचे दस्तुरखुद्द पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रिपोर्टरला सांगितले. आपल्याकडे साप पाहितला की, भीतीचे वातावरण निर्माण होते.

त्यात कोब्रा असेल तर अधिकच भीती वाटते आणि या भीतीतून या सापाला मारले जाते. पर्यावरण जोपासण्यासाठी साप किती महत्वाचा आहे याची माहिती देणारा हर्ष पोद्दार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. इंग्लिशमधून कोब्रा जातीच्या सापाची माहिती हर्ष पोद्दार हे देत आहेत. एक मिनिट आणि ७ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पर्यावरण, भारतीय संस्कृती आणि शेतकर्‍याला सापाची कशी मदत होते याची माहिती हर्ष पोद्दार यांनी दिली आहे. याबाबत आम्ही हर्ष पोद्दार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सदरचा व्हिडिओ हा मालेगाव येथील आहे.

मी मालेगावला असताना कोब्रा जातीचा साप निघाला, त्यावेळी उपस्थितांनी त्या सापाला जीवंत मारण्याचा प्रयत्न सुरू केला मला याची माहिती झाल्यानंतर मी सर्प मित्राला बोलावून त्याच्या मदतीने मी हा साप पकडला. परंतु उपस्थितांची भीती जावी, सापाबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत, या उद्देशातून त्याठिकाणी मार्गदर्शन केले. साप हा शेतकर्‍यांचा मित्र असतो, शेतीच्या धानाची नासाडी करणार्‍या अन्य प्राण्यांवर त्याची वचक असते.

एखादा साप शेतात असेल तर धान्याची नासाडी करणारे अन्य प्राणी त्या शेतामध्ये येत नाहीत. शेतकर्‍यांच्या धानाची राखण साप करत असतो. त्यामुळे तो शेतकर्‍यांचा खरा मित्र आहे. पर्यावरण जोपासण्यासही सापाची मदत होते. भारतीय संस्कृतीत सापाची पुजा केली जाते, असे म्हणत आपल्याकडेही कुठे साप आढळले तर सर्पमित्राच्या मदतीने ते पकडून जंगला सोडून द्यावे, असे हर्ष पोद्दार यांनी सांगितले.