बेल्जियम : रुग्णालयात पोहोचल्या PM सोफी, तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी फिरवली पाठ, व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बेल्जियमच्या पंतप्रधान सोफी विल्मेस जेव्हा आपल्या अधिकृत भेटीदरम्यान ब्रुसेल्सच्या सेंट पीटर हॉस्पिटलमध्ये गेल्या तेव्हा वैद्यकीय कर्मचार्‍यांनी त्यांचे मनापासून स्वागत करण्याऐवजी त्यांच्याकडे पाठ फिरवली. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे पाहिले देखील नाही. त्या तिथे आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गेल्या होत्या.

खरं तर, जेव्हा विल्मेस रुग्णालयात दाखल झाल्या तेव्हा कर्मचारी कॉरीडॉरच्या दोन्ही बाजूंनी पंतप्रधानांकडे पाठ करून उभे राहिले. मेडिकल स्टाफची ही नाराजी पीपीई सूट आणि इतर संरक्षक उपकरणांच्या कमीमुळे होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटनेचा व्हिडिओ शेअर करत एका पत्रकाराने लिहिले, ‘सेंट पीटर हॉस्पिटलमध्ये पंतप्रधान सोफी विल्मेस यांचा विरोध.’ एका वृत्तसंस्थेनुसार, कोविड-१९ च्या संकटकाळात वैद्यकीय आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत सरकारच्या दृष्टिकोनामुळे असे झाले आहे. येथे कोरोनामुळे नऊ हजार लोकांचा झाला आहे.

आरोग्य कर्मचारी कमी वेतन, कमी बजेट आणि प्रशिक्षित नर्सच्या जागी स्वस्तात लोकांना भरती करून घेण्याच्या विरोधात आहेत. लोक व्हिडिओवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक सरकारच्या या वृत्तीवर निराशा व्यक्त करत आहेत, तर काहींनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या अनोख्या विरोधाचे कौतुक केले आहे. बेल्जियममध्ये कोरोनाची ५५,२०० प्रकरणे समोर आली आहेत.