रोज मनुका खा आणि चिरायू व्हा

पोलीसनामा ऑनलाइन : आपल्या रोजच्या आहारात आपण मनुक्यांचा वापर जेमतेम करत असतो. कधीकधी तर जेवणात मनुका आला तर बाजूला काढून टाकतो. किंवा खाण्याचे टाळतो. मात्र या लहानश्या मनुक्यांचे खुप फायदे आहेत. मनुका खीर, शिरा, पुलाव, हलवा यांच्यातील स्वादापूरता मर्यादित नाही, तर त्याचे अनेक गुणकारी आणि औषधी फायदे आहेत. या मनुक्यांमध्येही दोन प्रकार असतात हे तुम्हाला माहित आहे का?, मनुक्याला बेदाणे किंवा किशमिश म्हणतात आणि दुसरा म्हणजे काळा मनुका. हे दोन्ही आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहेत.

मनुक्याचे नेमके फायदे काय आहेत आणि त्यामुळे आपले आरोग्य कसे निरोगी राहते हे पाहूयात.

१. रोज मनुका खाल्ल्यानं शरीरातील रक्ताभिसरण चांगलं होतं. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या व्यक्तिंनी मनुकांचं सेवन करावं.

२. मनुकांमध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात आणि जॉईंटपेनचा त्रास होत नाही.

३. मूठभर मनुका खाऊन त्यावर पाणी प्यायल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम मनुका करतं. अशक्तपणा, अ‍ॅनिमियासारख्या आजारांवर मनुका गुणकारी आहेत.

४. वजन वाढवण्यासाठी रोजच्या आहारात मूठभर मनुक्यांचा समावेश करावा. मनुकांमुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

५. काळ्या मनुकांमध्ये लोह आणि पोटॅशियमचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे हिमोग्लोबीन, नियमित येणारा थकवा यांसारख्या समस्या भेडसावत नाहीत.

६. काळ्या मनुका भिजवून खाल्ल्या तर त्या शरीरासाठी लाभदायी आहेत. मात्र नुसत्याच खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढते.

७. अर्धशिशीचा त्रास असलेल्यांनी रोज काळे मनुके आणि धणे रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी हे पाणी प्यावं अर्धशिशीचा त्रास कमी होतो.

८. काळा मनुका रोज रात्री पाण्यात भिजत घालून खाल्ल्यानं पोट साफ होते. पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

९. काळे मनुके खाल्ल्यानं आम्लपित्त, अपचन, ढेकर येणं अशा प्रकारच्या समस्यांपासून सुटका मिळते.

१०. एवढेच नाही मूतखडा, लघवीच्या वेळी होणाऱ्या वेदना आणि जळजळ यावर गुणकारी आहे.

हा लहानसा मनुका तुमच्या कितीतरी शरिराच्या आरोग्याच्या समस्यांना दूर करू शकतो. त्यामुळे हा मनुका तुमच्या रोजच्या आहारात असणे, अधिक आवश्यक आहे.