अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्ष परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. त्याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. अंतिम वर्ष परीक्षांबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली असून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.

त्यानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबतही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रेग्युलेटरी बॉडींना कळवण्याचा निर्णय झाला,’ असे ट्वीट प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अंतिम वर्ष परीक्षा रद्द करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर राज्य सरकार परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्षाचा नवा अध्याय पाहायला मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

दुसरीकडे ’आदि(त्य) घोषणा आणि मग होमवर्क.. म्हणून आता लपून-छपून बैठका घ्याव्या लागतात. वारंवार परीक्षा रद्द एवढेच जाहीर होत आहे. निर्णय कधी याबाबत प्रसिद्धी माध्यमांना कुठलीच सूत्र माहिती देत नाहीत. दिवसागणिक विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. पदवी परीक्षा रद्द मग व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे काय ? तेही महाराष्ट्राचेच तरुण आहेत ना ? मग त्यांना का वार्‍यावर सोडताय ? अशा शब्दांत भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.