Bihar Assembly Election 2020 : भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही, संजय राऊतांची कबुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  बिहार विधानसभा निवडणूक रंगात आली आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासमोर सत्ता राखण्याचं आव्हान आहे. भाजप आणि जेडीयू हे दोन मित्रपक्ष एकत्र लढत असून त्यांच्यासमोर आरजेडी आणि काँग्रेसचे तगडे आव्हान आहे. त्याचबरोबर आता भाजपचा एकेकाळचा मित्रपक्ष शिवसेना देखील बिहारमध्ये निवडणूक लढणार आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.

यासंदर्भात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये काल ‘वर्षा’वरील भेटीत चर्चा झाली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे. या भेटीविषयी राऊत यांनी सांगितले, ‘बिहार निवडणुकीबद्दल कोणताही फॉर्म्युला अद्याप तयार झालेला नाही. तिथल्या काही लहान पक्षांना शिवसेनेसोबत काम करायचं आहे. यातले काही पक्ष जिल्हा स्तरावरचे आहेत. पप्पू यादव यांच्या पक्षानं शिवसेनेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे,’ असंदेखील राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्याचबरोबर बिहारमध्ये शिवसेना ४० ते ५० जागा लढवेल. मात्र अद्याप तरी युतीबद्दल कोणाशीही चर्चा झालेली नाही.

पुढील आठवड्यात मी पाटण्याला जाणार असून तेथील स्थानिक नेत्यांची चर्चा करून निर्णय घेणार आहे. महत्त्वाचं म्हणजे भाजपला रोखण्यासाठी शिवसेना प्रयत्न करते आहे का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर बिहारमध्ये भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.दरम्यान, बिहारमध्ये काँग्रेसने लालू प्रसाद यांच्या आरजेडी बरोबर आघाडी केली आहे.तसेच मायावतींच्या बसपानं असादुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबत ‘वंचित’ आघाडी उभारली आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघेच उरल्याने त्यांना एकत्र येण्यावाचून पर्याय नसल्याचं देखील समोर येत आहे.