Video : ‘नितीश कुमार चोर है… मनरेगा का पैसा खाया है,’ मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेत घोषणाबाजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरु आहे. भाजप ( BJP) आणि जेडीयू ( JDU) एकत्रित निवडणूक लढवत असून आरजेडी ( RJD) आणि काँग्रेसची ( Congress) आघाडी एकत्र निवडणूक लढवत आहे. मोठ्या प्रमाणत प्रचार सुरु असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार ( Nitish Kumar ) यांच्यापासून ते अगदी केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेकजण या प्रचारामध्ये उतरल्याचे चित्र दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या देखिल प्रचारसभा लवकरच होणार आहेत. त्याआधी बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार ( Nitish Kumar) यांच्याविरोधात एका सभेमध्ये घोषणाबाजी झालेली दिसून आली.

https://twitter.com/scribe_prashant/status/1318192337160261633

बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील रफीगंज येथे मुख्यमंत्र्यांची प्रचारसभा सुरु होती. मुख्यमंत्री मतदारांना संबोधित करत असतानाच अचानक समोरच्या गर्दीमधून एकजण, “नितीश कुमार चोर है, नितीश कुमार चोर है। मनरेगा का पैसा खाया है।” अशा घोषणा देऊ लागला. त्यावेळी पोलिसांनी आणि जनता दल ( Janta Dal) युनायटेडच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभेमध्ये काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला सभेबाहेर नेल्यानंतर सभा पुन्हा झाली.

या व्यक्तीला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापर्यंत काही कागदपत्रे पोहोचवायची होती. परंतु त्याला जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी पुढे जाऊ न दिल्याने त्याने घोषणा द्यायला सुरुवात केली. दरम्यान, या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या व्यक्तीला जो कागद माझ्यापर्यंत पोहचवायचा आहे तो त्याच्याकडून घ्या आणि त्याच्याशी शांतपणे चर्चा करा, असं पोलिसांना सांगितलं. त्यामुळे बिहारमधील राजकीय वातावरण खूप तापले असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले आहे.