Bihar Assembly Election 2020 : राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार, बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले अनेक पक्ष बिहार विधानसभा निवडणूक लढवत आहेत. राज्यात सत्तेत असलेले शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणूक लढवत आहे. मात्र, राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना बिहार निवडणूक एकत्र लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. या चर्चेवर राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी खुलासा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे खासदार प्रफुल पटेल यांनी वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा चर्चांना आता त्यांच्या भूमिकेमुळे पूर्णविराम मिळणार आहे.

तद्वतच काँग्रेस आणि राजदसोबत एकत्र लढण्याची राष्ट्रवादीची भूमिका होती. यासंदर्भात बिहार काँग्रेस प्रभारी शक्ती सिंह गोहिल, जेष्ठ नेते अहमद पटेल, राजदचे तेजस्वी यादव यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र, काँग्रेसची सोबत लढण्याची तयारी नाही. म्हणून स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असे पटेल यांनी सांगितलं.

शिवसेना लढणार ४० जागा

खासदार संजय राऊत यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना ४० ते ५० जागा लढवणार असून कोणासोबत युती करायची हे अजून ठरलेलं नसल्याचं म्हटलं. पप्पू यादव यांनी एकत्र लढण्याबाबतचा प्रस्ताव दिला असल्याचेही राऊत यांनी सांगितलं.