‘जर भाजपनं पुन्हा नितीश यांना मुख्यमंत्री बनवलं, तर याचं श्रेय शिवसेनेला जाईल’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची देशात सर्वत्र चर्चा होत आहे. एक्झिट पोलच्या निकालाच्या उलट राज्यात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दरम्यान, राजद नेते तेजस्वी यादव यांच्या ‘लढाऊ वृत्तीचे’ कौतुक करत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. पक्षाने बुधवारी सांगितले की, जेडीयूच्या कमी जागा असूनही नितीश कुमार जर मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळत असतील तर याचे श्रेय शिवसेनेला द्यायला हवे. पक्षाने सांगितले की, भाजपने नितीश कुमार यांना आश्वासन दिले होते की, निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या जागा कमी आल्या तरी तेच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री होतील.

शिवसेनेने सांगितले की, 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला असेच आश्वासन दिले होते, परंतु त्यांचे हे वचन त्यांनी पाळले नाही, ज्यामुळे राज्यात राजकीय तमाशा घडला. शिवसेनेने आपले मुखपत्र ‘सामना’ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संपादकीयमध्ये असे लिहिले आहे की, बिहार निवडणुकीत जेडीयू 50 जागादेखील जिंकू शकणार नाही, तर भाजपने 70 जागा आपल्या झोळीत टाकल्या आहेत.

‘सामना’मध्ये लिहिण्यात आले की, “भाजप नेते अमित शहा यांनी जाहीर केले की नितीश कुमार हेच बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील, जरी त्यांच्या पक्षाला कमी जागा मिळाल्या तरी, परंतु अशाच पद्धतीचं आश्वासन 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला दिलं गेलं होतं, ज्याचा सन्मान केला गेला नाही आणि राज्याला राजकीय ‘महाभारत’ पाहावं लागलं.”

संपादकीयमध्ये लिहिले गेले की, “जागा कमी असूनही नितीश मुख्यमंत्री झाले तर श्रेय शिवसेनेलाच जायला हवे.” उल्लेखनीय म्हणजे भाजप आणि शिवसेनेने 2019 साली युतीमध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढविली होती, पण निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून मतभेद झाल्यामुळे दोघे वेगळे झाले होते. तसेच सामनामध्ये लिहिण्यात आले की, “बिहारने तेजस्वी युगाचा उदय पाहिला. त्यांनी एकट्यानेच सत्तेत असलेल्या लोकांशी लढा दिला. बिहारमध्ये मोदींची जादू चालली आहे असे म्हणणे म्हणजे तेजस्वी यांच्यावर अन्याय होईल. सुरुवातीला एकतर्फी म्हणून पाहिली जाणारी बिहार निवडणूक ही तेजस्वी यांच्यामुळे अटीतटीची झाली.”

शिवसेनेने म्हटले आहे की, कॉंग्रेसच्या निकृष्ट कामगिरीमुळे तेजस्वी यांची सरकार स्थापन होण्याची शक्यता धुळीस मिळाली. संपादकीयनुसार, “तेजस्वी पराभूत झालेले नाहीत. निवडणुकीत पराभवाचा अर्थ पराभव असा नसतो. त्यांचा लढा एक मोठा संघर्ष आहे- केवळ परिवारातच नाही तर पटना आणि दिल्लीमध्ये बसलेल्या सामर्थ्यवान लोकांविरुद्धही.”

शिवसेनेने म्हटले की, “नरेंद्र मोदींनी (पंतप्रधान) त्यांना ‘जंगल राजचे युवराज’ असे संबोधले तर नितीश कुमार यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले की, ही त्यांची शेवटची निवडणूक आहे, परंतु तेजस्वी यांनी निवडणूक प्रचारात विकास, रोजगार, आरोग्य, शिक्षण या विषयांवर आपले लक्ष केंद्रित केले. सामनाने लिहिले की, “बिहार निवडणुकीने राष्ट्रीय राजकारणात तेजस्वी यांच्या रूपात एक नवीन चमकणारा चेहरा समोर आणला आहे. त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत.”