बिहार निवडणूक : पहिल्या टप्प्यासाठी बुधवारी मतदान

पाटणा : वृत्तसंस्था – संपूर्ण देशाचे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकीकडे लागलेले आहे. सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर भाजप, शिवसेनेमध्ये आरोप – प्रत्यारोप झाले. बिहार निवडणुकीत भाजपने हा प्रचाराचा मुद्दा केला. महाराष्ट्राचे माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपने पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून नेमले. याकारणाने बिहारच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष अधिकच लागलेले आहे. या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ७१ जागांसाठी बुधवारी मतदान होत आहे. या ७१ जागांमध्ये माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी, विद्यमान आठ मंत्री आणि काही दिग्गजांचे भवितव्य ठरणार आहे.

गेले चार दिवस कांद्याच्या दरात वाढ झाली, तो ताजा मुद्दा राष्ट्रीय जनता दलाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी उचलून धरला असून भाजपवर टीका केली आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा संदेश प्रसारित करणारा व्हिडीओ सोशल मिडियावर मंगळवारी व्हायरल करण्यात आला आहे. त्याद्वारे त्यांनी राजद आणि काँग्रेस आघाडीला मतदान करावे असे आवाहन बिहारच्या जनतेला केले आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात भाजप आणि जनता दल युनायटेड यांच्या युतीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा या प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला.