‘कोरोना’मुळे राज्यातील जैववैद्यकीय कचरा दिवसाला 100 टनांवर

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय उपचारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाढल्यानंतर एका दिवसाला राज्यातील एकूण जैववैद्यकीय कचरा 100 टनांवर पोहचला आहे. नेहमीच्या जैववैद्यकीय कचर्‍यापेक्षा सुमारे 40 टन अधिक कचरा तयार होत आहे.

राज्यात एप्रिल महिन्यातील दिवसाला 6.96 टन कोव्हिड जैववैद्यकीय कचर्‍याचे प्रमाण मे महिन्यात दुप्पटीहून अधिक झाले. जून महिन्यात ते 30.37 टनावर पोहचले. दरम्यानच्या काळात इतर वैद्यकीय उपचाराचे प्रमाण कमी झाल्याने इतर जैववैद्यकीय कचरा नेहमीपेक्षा अर्ध्यावर आला. पण इतर वैद्यकीय उपचार वाढू लागल्यावर जुलैमध्ये इतर जैववैद्यकीय कचरा पुन्हा 60 टनापर्यंत पोहचून एकूण जैववैद्यकीय कचरा 90 टनाच्या आसपास पोहचला आहे. जैववैद्यकीय कचर्‍यातील वैयक्तिक सुरक्षा साधनांच्या (पीपीई किट) वाढत्या प्रमाणामुळे त्याशिवाय अलगीकरण केंद्रातील इतर अजैववैद्यकीय सामग्रीची सरमिसळ होत आहे. त्यामुळे कचरा विल्हेवाट केंद्र आणि यंत्रसामग्रीवर अनावश्यक ताण येत असे. ऑगस्टमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुधारित नियमावली लागू केल्यानंतर हा ताण कमी झाला आहे. मात्र एकू णच वैद्यकीय उपचारातील सुरक्षासाधनांच्या वाढत्या वापरामुळे एकूण जैववैद्यकीय कचर्‍याचे प्रमाण सप्टेंबरमध्ये 103.85 टनावर पोहचले आहे.