‘खेळण्या’च्या बाजारातून चीन होणार हद्दपार ! जगभरात ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची छाप सादर करतील भारतीय खेळणी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – खेळणी बाजारातून चीनला हद्दपार करण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: खेळणी मॅन्यूफॅक्चरिंग प्रोत्साहन योजनेचा आढावा घेत आहेत. पंतप्रधानांना केवळ देशातील बाजारावर नव्हे, तर जगातील बाजारात भारतीय खेळण्यांची छाप पहायची आहे. मोदींनी खेळणी मॅन्यूफॅक्चरर्सना सांगितले की, त्यांनी अशी खेळणी बनवावीत ज्यामध्ये एक भारत, श्रेष्ठ भारतची झलक असेल आणि खेळणी पाहून जगातील लोक भारतीय संस्कृती, पर्यावरणाबाबत भारताची गंभीरता आणि भारतीय मूल्ये समजू शकतील.

त्यानी स्थानिक कारागीरांनी बनवलेल्या खेळण्यांना प्रोत्साहन देण्यास सांगितले. मार्केट रिसर्च फर्म आयएमएआरसीनुसार भारतात खेळण्यांचा व्यापार 10,000 कोटी रूपयांचा आहे. यापैकी संघटीत खेळणी बाजार 3500-4500 कोटी रूपयांचा आहे.

संघटीत खेळणी बाजार 85-90 टक्केपर्यंत चीनकडून होणार्‍या आयातीवर अवलंबून आहे. चीनकडील ही आयात रोखण्यासाठी सरकारने या वर्षी फेब्रुवारीत खेळणी आयात शुल्कात 200 टक्केची वाढ केली होती. परंतु, खेळण्यांची आयात अजूनही सुरूच आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार व्यापार व उद्योग मंत्रालय लवकरच खेळण्यांच्या आयातीवर लायसन्स पद्धत सुरू करत आहे. भारतीय खेळणी उद्योग आत्मनिर्भर बनण्याची आशा आहे. या उद्योगासाठी वोकल फॉर लोकल घोषणेंतर्गत काम केले जात आहे. खेळणी मॅन्यूफॅक्चरर्स आणि संबंधित अधिकार्‍यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी म्हटले की, देशात खेळण्याच्या निर्मितीचे अनेक क्लस्टर आहेत आणि शेकडो कारागीर स्वदेशी खेळण्यांची निर्मिती करत आहेत.

मोदी म्हणाले, स्थानिक कारागीर जी खेळणी बनवतात, त्यामध्ये भारतीयत्वाची आणि संस्कृतीची झलक असते. अशा लोकांच्या कल्पना आणि कलात्मकतेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जागतिक मानकांची पूर्तता करणे हेदेखील महत्वाचे आहे. खेळणी केवळ उद्योगासाठीच नसतील तर मुलांच्या बौद्धिक विकासासाठी ती मदत करतील. सर्व आंगणवाडी, सरकारी शाळांमध्ये खेळण्यांच्या माध्यमातून शैक्षणिक काम केले जाऊ शकते. तंत्रज्ञान आणि नवीन कल्पनांसाठी या उद्योगात तरूणांना जोडले जावे. या कामासाठी देशातील तरूणांमध्ये स्पर्धा घेण्यात यावी.