‘शरद पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्रातील जनता बघतेय; राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. तेव्हा त्याची चौकशी करून निर्णय घेऊ असे आधी म्हणायचं आणि नंतर त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असे म्हणून पाठीशी घालायच हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून ती राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा टोला भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला लगावला आहे.

बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात विरोधकांनी रान उठवले आहे. मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा महिला आघाडी सोमवरपासून राज्यभरात आंदोलन करणार आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात सावध भूमिका घेतल्याने आमदार भातखळकर यांनी टीकास्त्र सोडले आहे.

काय म्हणाले होते शरद पवार ?
आम्ही धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाबाबत चर्चा केली आहे, त्याचसोबत त्या महिलेवरही ब्लॅकमेलिंगसारखे गंभीर आरोप झाले आहेत, वेगळ्या विचारांचे, वेगळ्या भूमिकेचे लोकही एकाच महिलेबद्दल बोलत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसीपी दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, असे आपण सुचवले आहे. आता हे प्रकरण पोलिसांकडे आहे. संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे शरद पवारांनी सांगितले.

एका आठवड्यात चौकशी करा – गृहमंत्री
या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि अतिरिक्त आयुक्त संदीर कर्णिक, ज्योत्सना रासम यांची बैठक घेतली. बैठकीत एका आठवड्यात धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी करावी अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मुंबई पोलीस सहा आठवड्यांच्या चौकशीनंतर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेऊ शकतात. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी पूर्ण व्हावी असे मत गृहमंत्र्यांनी मांडले आहे. त्यामुळे आणखी एक आठवडा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत सस्पेन्स कायम राहिला आहे.