डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीड मतदार संघातून भाजप- शिवसेना महायुतीकडून डॉ. प्रीतम मुंडे लढत आहेत. त्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा निवडणूकीसाठी वापर केल्याचा आरोप बीडमधील अपक्ष उमेदवार कालिदास आपटे यांनी केला आहे. केवळ असा एकच नाही तर अनेक आक्षेप डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जाबाबत घेण्यात आले आहेत.

प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर खालील आक्षेप

‘प्रीतम गोपीनाथ मुंडे’ नावाने बीड जिल्ह्यातील नाथरा येथे मतदान यादीत नाव आहे. तर मुंबई येथील वरळीमध्ये प्रीतम गौरव खाडे नावाने त्यांचं मतदार यादीत नाव असल्याची टीका कालिदास यांनी केली आहे.

त्याचबरोबर वरळी येथील प्लॉट १२०१ स्थावर मालमत्तेची माहिती प्रीतम मुंडे यांनी लपवली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रीतम मुंडे यांच्याकडे वेगवेगळ्या नावाने दोन आयकर विभागाचे ओळखप्रत्र आहे असंही कालिदास यांनी म्हटलं आहे.

प्रीतम गोपीनाथराव मुंडे या लोक भावनेशी खेळत असून त्या विशिष्ट व्यक्तीच्या नावाचा फायदा घेऊन मतांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच लोकभावनेचा गैरवापर करणे हादेखील एक लोकप्रतिनिधी कायदा १९५१ नुसार गुन्हा आहे त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर करावा

प्रीतम मुंडे या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळात सहभागी आहेत. त्यांच्यावरील गंभीर स्वरूपाच्या गुन्हय़ाची माहिती लपवली. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी कालिदास यांच्याकडून करण्यात आली आहे.

तर राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनीदेखील प्रीतम यांच्यावर असे अक्षेप घेतले आहे. निवडणूक अधिकारी या प्रकरणाची ४ वाजता सुनावणी करणार आहेत.