एकनाथ खडसेंनी जयंत पाटलांच्या ट्विटला केलं रिट्विट, दिले राष्ट्रवादीच्या प्रवेशाचे सूचक संकेत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सुद्धा हिरवा कंदील दाखवल्याची सांगितले जाते. मात्र, भाजप नेत्यांनी खडसे पक्ष सोडून कोठेही जाणार नसल्याचे ठामपणे सांगत आहेत. परंतु, आता खुद्द एकनाथ खडसे यांनीच राष्ट्रवादी पक्षप्रवेशा संदर्भात सूचक असे संकेत दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासियांना संबोधून भाषण केलं होते. त्या भाषणावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका करत ट्विट केले होते. ते ट्विट एकनाथ खडसे यांनी रिट्विट केले आहे. जयंत पाटील म्हणाले की, “आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र, यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला.”

जयंत पाटील यांचे ट्विट एकनाथ खडसे यांनी आपल्या अधिकृत अकाउंटवरुन रिट्विट करत मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. खडसेंच्या या भूमिकेमुळे त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही वेळात त्यांनी हे ट्विट डिलीट केल्याचे दिसून आले.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे हे २२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची सांगण्यात येत आहे. मात्र, नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपचे जेष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. सगळ्यांचा हिरमोड होईल, भाजपचे नुकसान होईल असे कोणतेही कृत्य ते करणार नाहीत, त्यांची नाराजी संपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.