चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले – ‘उध्दवजी, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी हात जोडून पंतप्रधानांना प्रार्थना करतो, हे नाटक का करत आहात?’ (Video)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयाने काल मराठा आरक्षणाबाबत ऐतिहासिक असलेला निकाल दिला. राज्य सरकारने पारित केलेला आरक्षणासंबंधी कायदा रद्द केला गेला. यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. सत्ताधारी आणि विरोधक परस्परांस भिडले आहे. मराठा आरक्षण कायदा रद्द करताना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामध्ये म्हटले की, कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आणि राष्ट्रपतींचा असल्याचे म्हटले. यावरूनच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायदा करण्यासाठी पंतप्रधान मोदींना विनंती केलीय. या मुद्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, उद्धवजी, स्वतःचे अपयश झाकण्यासाठी हात जोडून पंतप्रधान मोदींना प्रार्थना करतो, असे नाटक तुम्ही का करत आहात? ज्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसला आहात त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाच नाही आणि यासाठी फक्त तुम्हीच जबाबदार आहात, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

 

 

 

 

 

पाटील म्हणाले, स्वत:चे अपयश झाकण्यासाठी तुमच्याद्वारे केले गेलेले विधान मराठा समाजाला आक्रोशीत करत आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टात एका न्यायाधीशासमोर आपली बाजू मांडू शकला नाहीत, याची शिक्षा आता संपूर्ण समाजाला भोगावी लागणार आहे. तर काँग्रेस सोबत जोडल्या गेलेल्या शंभर सधन कुटुंबांची मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी इच्छा आहे. आमच्या सारख्या गरीब कुटुंबांना या आरक्षणाची गरज होती. परंतु, काँग्रेस कधीही कोणालाही पुढे जाऊ देणार नाही. मराठा व्यक्तीच्या नावापुढे मागासवर्गीय लिहिलं जावं हे त्यांना नको आहे. आता शिवसेना सुद्धा फक्त सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसच्या या कारस्थानात सामील झाली आहे, हे अतिशय वेदनादायी आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, तर शहाबानो प्रकरण, अ‍ॅट्रॉसिटीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर संसदेने कायदा करून निर्णय बदलले. तेच मराठा आरक्षणासंदर्भातही करता येऊ शकते. मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकत्र आहेत आणि या समाजाला आरक्षण द्या, ही आमची एकमुखी मागणी आहे. या मागणीचे पत्र आपण उद्याच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठवू आणि गरज पडली तर दिल्लीला जाण्याचीही आपली तयारी आहे. या न्याय मागणीचा पंतप्रधान अनादर करणार नाहीत,असा माझा विश्वास आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संबोधताना म्हटले होते.