मुख्यमंत्रिपदासाठी सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी, अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीचे शंभर टक्के समर्थन असू शकते, असे मत भाजप नेते आमदार आशिष शेलार ( BJP leader MLA Ashish Shelar) यांनी व्यक्त केले होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP chief Sharad Pawar) हेदेखील उपस्थित होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, यावरून भाजपचे नेते चंद्रकांत पाटील ( BJP leader Chandrakant Patil) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या पुस्तकातील दाखला देत शेलारांनी मराठा महिलेला मुख्यमंत्री करण्याचे वक्तव्य केले होते. यावरून चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हणाले की, सुप्रिया सुळेंना आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. ते वक्तव्य आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठा महिला, भाजपच्या मराठा महिला आणखी कोणाबाबत नाही. त्या पुस्तकातल्या बाबींशी त्या वक्तव्याचा संदर्भ आहे. सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे की नाही हे राष्ट्रवादीनेच ठरवावे, असे पाटील म्हणाले.