भीमा कोरेगाव : चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य, राज्य सरकारला दिले ‘आव्हान’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भीमा कोरेगाव, फोन टॅपिंग हा सगळा कल्पनाविलास असून त्या प्रकरणांची चौकशी लवकरात लवकर करून याचा अहवाल द्या, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिले आहे. चंद्रकांत पाटील हे आज पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचे स्वागत केले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सरकार रोज काही तरी बाहेर काढत आहे. मात्र, सरकार याचा शोध लावत नाही. शिव स्मारकावर कॅगने ठपका ठेवला असून त्याची चौकशी का सुरु केली नाही. चौकशीच्या नावाखाली स्मारकाचे काम थांबवू नका. चौकशी करून संबंधीत दोषींवर कारवाई करा. सध्या एनआयए तपासावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, केंद्राला चौकशीचे पूर्ण अधिकार आहेत. आपण राज्यमंत्री असताना मला अधिकार नव्हते असे वक्तव्य माजी मंत्री दिपक केसरकर यांनी केले होते. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, केसरकर काय म्हणाले माहिती नाही, पण राज्यमंत्र्यांनाही अधिकार असतात असे त्यांनी सांगतले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाअधिवेशनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असलेला भगव्या रंगाच्या झेंड्याचे अनावरण केले. मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मनसेने हिंदुत्वाची कास धरली आहे याचा आनंद आहे. मात्र, याच मुद्यावरून दोन्ही पक्ष भविष्यात एकत्र येतील का नाही हे भविष्य ठरवेल. त्यापूर्वी राज ठाकरे यांना परप्रांतीय विरोधी भूमिका बदलावी लागेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा –