मुस्लीम आरक्षणाला भाजपचा कडाडून विरोध, ठाकरे सरकारच्या घोषणेनंतर BJP आक्रमक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून मुसलमानांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा अध्यादेश काढणार असल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर भाजपने मुस्लीमांना आरक्षण देण्यास विरोध केला आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची संविधानात तरतूद नसल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणाला विरोध केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची संविधानात तरतूद नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना दहा टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे. असं असतानाही राज्य सरकारने मुस्लीम आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. मात्र, आमचा धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यास विरोध असल्याचे सांगत त्यांनी मुस्लीम आरक्षणाच्या निर्णयावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

मुस्लीम समजाला धर्माच्या आधारावर आरक्षण दिल्यास राज्यातील ओबीसी आरक्षणावर परिणाम होऊ शकतो. तसंच मराठा आरक्षणदेखील अडचणीत येऊ शकतं. कारण विशेष बाब म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत सहभागी होत असताना नेमकी कोण-कोणत्या मुद्यांवरुन तडजोड केली, असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.