भाजपवर ‘नाराज’ एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना ‘उधाण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यातील विधानसभेचे निकाल लागले, भाजपची सत्ता गेली. त्यानंतर भाजपमधील नेत्यांची नाराजी आता डोके वर काढू लागली आहे. काही दिवसांपासून भाजपमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज असल्याचे दिसत आहे. त्यानंतर आज भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेटी घेतली. नाराज एकनाथ खडसे हे आज विधानसभा निवडणूकीनंतर दिल्लीत दाखल झाले. यानंतर आता दिल्लीत एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत.

आज दिल्लीत आल्यावर ते दुपारी 3.30 वाजता दिल्लीतील भाजपच्या नेत्यांना भेटणार होते. त्यांनी त्यासाठी वेळ मागली होती, परंतू आपल्याला त्यांची वेळ मिळाली नसल्याचे खडसेंनी सांगितले. यावेळी खडसे, भाजप नेते जे. पी. नड्डा आणि भूपेंद्र यादव यांची भेट घेणार होते. परंतू यानंतर ते शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले.

एकनाथ खडसेंची भाजपवरील नाराजी लपून राहिलेली नाही. त्यानंतर ते आज दिल्लीत दाखल होऊन भाजप नेत्यांना भेटण्याच्या विचारात होते. परंतू भाजप नेत्यांनी त्यांना वेळ दिला नाही. त्यानंतर ते शरद पवारांच्या भेटीला गेले. कदाचित पक्ष श्रेष्ठींचे म्हणणे काय आहे हे त्यांना जाणून घ्यायचे असावे.

आज भाजपची उत्तर महाराष्ट्रस्तरावरील 5 जिल्ह्यांची बैठक पार पडली, यात खडसेंनी अचानक उपस्थिती लावली होती. परंतू बैठकीतून बाहेर पडल्यानंतर देखील खडसेंच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून आली होती. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांना पाडणाऱ्यांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे दिल्याचे सांगितले.

तेव्हा बैठकीनंतर एकनाथ खडसे म्हणाले होते की, ओबीसी नेत्यांमुळे पक्ष मोठा झाला. काही लोकांकडून सातत्याने अन्याय होतोय. विरोधी भूमिका करणाऱ्यांवर पक्ष कारवाई करेल. एकनाथ खडसेंनी दावा केला होता की मी प्रदेशाध्यक्षांकडे पुरावे सोपवले आहेत. एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्यात चर्चा देखील झाली होती.

याआधी पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबूकवर पोस्ट लिहित आपल्या समर्थकांना सूचक संदेश दिला होता. त्यानंतर पंकजा मुंडे भाजपला निरोप देतील अशी चर्चा होती. आता भाजपचे अनेक नेते बंड करण्याच्या विचारात दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली होती.

Visit : Policenama.com