भाजपाचा राजीनामा दिला का ?, एकनाथ खडसेंनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मी भाजपा हा माझा पक्ष सोडलेला नाही तसेच राजीनामाही दिलेला नाही असं भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा आणि वृत काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले होते. मात्र, एकनाथ खडसे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मी भाजपा हा पक्ष सोडलेला नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. जळगावता गेल्या काही दिवसांपासून घटनस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे भाजपा सोडणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी मी पक्ष सोडलेला नाही, राजीनामा दिलेला नाही असे म्हणत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही याबाबतचे वृत्त फेटाळून लावले आहे. एकनाथ खडसे यांच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनाम्याविषयी मला काहीही माहिती नाही. तसेच त्यांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, आज एकनाथ खडसे यांनी याबाबत खुलासा केल्याने पक्षांतराच्या चर्चांना सध्यातरी पूर्णविराम दिला आहे.