‘दिवसाढवळ्या ‘स्वप्न’ पाहणं सोडा’, भाजपच्या ‘या’ नेत्याचा संजय राऊतांना ‘टोला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गोव्यात राजकीय भूकंप घडणार असे सूचक विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. त्यांनी असा ही दावा केली की गोव्याचे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई हे समर्थक आमदारांसह शिवसेनेच्या संपर्कात असून भाजपविरोधी सरकार गोव्यात येईल. परंतू संजय राऊतांच्या या दाव्यानंतर काँग्रेसकडून हा दावा फेटाळण्यात आला. भाजप सरकार पाडण्याच्या कोणत्याही आघाडीसाठी आपण प्रयत्नशील नसल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर भाजपच्या विनय तेंडुलकर यांनी देखील राऊतांना सल्ला दिला की दिवसाढवळ्या स्वप्न पाहणं बंद करा.

संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर म्हणाले की मला गोव्यात भाजप सरकार कोसळलेले पाहायला आवडेल. मात्र त्याची शक्यता फार कमी दिसते. 40 सदस्यांपैकी 30 सदस्य भाजपच्या बाजूने आहेत. त्यामुळे सरकार पाडण्यापेक्षा विरोधात बसण्याची आमची प्राथमिकता असेल.

काँग्रेसच्या या स्पष्टी करणानंतर भाजपाने देखील संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी स्वप्न पाहणं बंद करावे. महाराष्ट्रात जिथे तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केलं. तिथे जनतेला दिलेली आश्वासन तुम्ही पूर्ण करा. दिवसा-ढवळ्या स्वप्न पाहू नका असा टोमणा विनय तेंडूलकरांनी संजय राऊत यांना लगावला. संजय राऊतांनी शुक्रवारी या संबंधित ट्विट मध्ये म्हणले होते की, आम्ही बुद्धिबळात अशी कमाल करतो की, प्यादाही राजाला मात करतो.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की गोव्याचे विजय सरदेसाई यांच्याकडे 3 आमदार आहेत. भाजपमध्ये गेलेले काँग्रेसचे आमदारही संपर्कात आहेत, मगोचा 1 आमदार संपर्कात आहेत. गोव्यात शिवसेना भाजपविरोधात आघाडी उघडणार आहे, पर्रिकरांच्या मंत्रिमंडळात राहिलेले विजय सरदेसाई यांनी यांच्या समर्थक आमदारांसह शिवसेनेशी आघाडी करणार असल्याचे राऊत म्हणाले. तसेच भाजप सरकार धोक्यात येईल, फक्त गोव्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात भाजपविरोधात आघाडी उघडण्यात येणार असल्याचे राऊतांनी सांगितले होते.

Visit : Policenama.com