‘आज पत्ते तुम्ही पिसताय, पण डाव आम्ही उलटवून लावू’; खा. राऊत यांचा भाजपला इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आमची सत्ता असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, हे लक्षात घ्या. सध्या सुरू असलेले सुडाचे आणि बिनबुडाचे राजकारण संपू द्या.
आज पत्ते तुम्ही पिसताय, पण डाव आम्ही उलटवू, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader MP Sanjay Raut) यांनी भाजपला दिला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी संपू द्या. मग आर्थिक गैरव्यहार केलेल्या 100 प्रमुख नेत्यांची यादी माझ्याकडे असून, ती मी ईडी ( List of 100 leaders Will give to the ED And the Ministry of Finance) आणि अर्थ मंत्रालयाला पाठवणार आहे. त्यांच्यावर काय कारवाई होते बघू, असे खा. राऊत यांनी बजावले आहे. त्यामुळे खा. राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आमदार सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर काल सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापे टाकले. त्यांचे पुत्र विहंग यांना ताब्यात घेऊन त्यांची पाच तास चौकशी केली. यानंतर आज प्रताप सरनाईक आणि विहंग यांची चौकशी केली जाणार आहे. यावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्ही चौकशांना घाबरत नाही. चौकशांना आता तुम्हाला घाबरावे लागेल. सध्या जुनी थडगी उकरण्याचे काम ईडीकडून सुरू आहे. आता ईडीवाले खोदकाम करत मोहंजोदडो, हडप्पापर्यंत जातील, असा टोला राऊत यांनी लगावला. तुम्हाला ईडीची नोटीस आली का? या प्रश्नाला राऊत यांनी अद्याप तरी आलेली नाही. मी वाट पाहतो आहे. सध्याच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणे आणि भाजपविरोधात बोलणे हा गुन्हा झाला असल्याचे उत्तर राऊत यांनी दिले आहे.